मोरोपंत - केकावली
हा पहिला श्लोक नमनाचा आहे. यामध्ये भगवान् श्रीविष्णूंच्या स्तुत्यर्थ आठ विशेषणे आहेत, आणि नंतर, "तुला सदैव नमस्कार असो" असे म्हटले आहे. सदाश्रितपदा हे सज्जन ज्याच्या पायांशी आश्रित आहेत अशा! सदाशिवमनोविनोदास्पदा हे सदाशिवाच्या मनास आनंद देणाऱ्या! किंवा, शिवाच्या मनास नेहमी आनंद देणाऱ्या! स्वदासवशमानसा हे आपल्या दासांच्या, भक्तांच्या मनाला वश होणाऱ्या! कलिमलांतका हे कलियुगाच्या मलाचा म्हणजेच पापाचा नाश करणाऱ्या! कामदा हे इच्छित देणाऱ्या! वदान्यजनसद्गुरो हे थोर दानी लोकांच्या स्वामी! म्हणजेच, दानीजनांमध्ये श्रेष्ठ अशा! प्रशमितामितासन्मदा हे अनेक (अमित) दुष्टांच्या (असत्) मदाचे शमन केलेल्या (प्रशमित+अमित+असत्+मदा)! गदारिदरनन्दकाम्बुजधरा हे गदा, चक्र, शंख, नन्दक नावाचा खड्ग आणि कमळ धरून असलेल्या! ('अरि' = चक्र, 'दर' = शंख) नमस्ते सदा तुला सदैव नमस्कार असो. ही सर्व विशेषणे संस्कृत असली तरी त्यांच्या विभक्ती मात्र मराठी संबोधनाच्या आहेत. मराठीमध्ये संबोधन 'हे देवा' असे असते तर संस्कृतमध्ये 'हे देव' असे. इथे सदा, -स्पदा, स्वदा, -मदा, वगैरे शब्द योजून अनुप्रास साधला आहे.
वर्षा ऋतूमध्ये पाण्याने भरलेल्या मेघांना पाहून, वर्षावासाठी आतुर झालेल्या मोराच्या किंकाळ्यांना 'केका' म्हणतात. म्हणूनच मोराला 'केकी' असेही नाव आहे. इथे ह्या मोराने, म्हणजेच कवि मोरोपंतांनी, दयाघन अशा भगवंताने कृपावर्षाव करावा यासाठी ज्या किंकाळ्या फोडल्या, त्यांची जी आवली, ती ही 'केकावली'.
पहिल्या नमनाच्या श्लोकानंतर हा मोर आता आपली व्यथा मांडतो आहे -
अघाचळहि तारिले बहु तुवाचि राधारते ।
अजामिळ अघासुर व्रजवधू बकी पिंगळा ।
अशा गति दिली उरे न तृण भेटता विंगळा ।। २।।
भगवंता, तुझ्या चरणकमलांची जी धूळ, ती सर्व पावन वस्तूंना आधारभूत होय. हे राधारमणा! पापांचे अनेकपर्वत तूच तारले आहेत. अजामिळ, अघासुर, व्रज प्रदेशात राहणाऱ्या गोपिकांचा वेष धारण करून आलेली पृतना, बकासुर आणि पिंगळा यांसारख्या पाप्यांनाही गतिही तूच दिलीस. ज्या प्रमाणे निखाऱ्याला भेटताच कस्पट तत्क्षणी जळून जाते, त्याप्रमाणे तुझी पायधूळ लागताच पापही तत्क्षणी नाश पावते. इंगळा = निखारा.
"तुझ्या पायधुळीने पुष्कळ पापांचे साठे शुद्ध केले (शोधिले) आहेत." असे सतत ऐकणारे व सतत बोलणारे ज्ञानी, सदाचारी लोक (शुकसनकादिक मुनि, तसेच संत लोक) जे सांगतात ते खोटे नक्कीच (अनृत) नाही. पण मीच त्याला प्रमाण न म्हणावे हे माझ्या नीचतेस उचितच आहे! अन्वय - "तुझ्या पदाच्या रजे बहुत अघनिधी शोधिले." असे सतत ऐकते, सतत बोलते जे सदाचार बुधजनी वर्णिती ते अनृत न. जरी मीच ते प्रमाण न म्हणो, (तरी) माझ्या नीचते उचित. अर्थात् - पंडित, बुधजन व सदाचारी जन म्हणतात तसे, “तुझ्या पायधुळीने पापांचे साठे शुद्ध होतात.” हे सतत ऐकूनही ते प्रमाण न मानणे हे माझ्याच नीचतेचे प्रमाण (लक्षण) मानायला हवे.
कृपाचि सरली ? असेहि न घडे जगन्नायकी !
नसेन दिसलो कसा ? नयन सर्वसाक्षी रवी !
विषाद धरिला म्हणों ! न सुरभी विष क्षीरवी ।।४।।
(मागील केकेत म्हटल्याप्रमाणे - तुझ्या पायधुळीने पापांचे साठे शुद्ध होतात हे जर पूर्णपणे खरे असले तर मग -) मी तसाच उपेक्षित कसा बरे उरलो? मी काय पतित नाही? का तुझी कृपाच सरली? पण असं कसं होईल? तू तर जगच्चालक आहेस! तुझी कृपा संपणे शक्य नाही. मग तुला मी दिसलोच नाही का? पण तसे तरी कसे होईल? तुझे डोळे म्हणजे सर्वकाही सक्षित्वाने पाहणारे सूर्यच आहेत! मग त्यांना मी दिसलो नाही असं होणारच नाही. आणि माझ्यावर रागावला असलास असे म्हणावे तर ज्याप्रमाणे कितीही खेद झाला असला तरी कामधेनू दुधाच्या ठिकाणी (तिच्यात शक्ती असूनसुद्धा) विष देणार नाही त्याचप्राणे तू अवकृपा करणार नाहीस. अर्थात् तू अतिशय दयाळू असल्याने तुला अवकृपा करणे शक्यच नाही. मग माझा उद्धार तू का बरे करीत नाहीस?
सलील तइ मंदराख्यहि नग स्वपृष्ठी धरा ।
वराह तनु घेउनी उचलले रदाग्री धरा ।
सुदुर्धर तुम्हां कसा पतित हा न का उद्धरा ।।५।।
व्रजभूमीचे (गोकुल प्रदेशाचे) रक्षण करण्यासाठी तुम्ही गोवर्धन पर्वताला आपल्या नखाच्या टोकावर बसविले, कच्छप रूप घेऊन मंदर नावाचा पर्वत सहज आपल्या पाठीवर घेतला, वराह अवतार घेऊन दाताच्या टोकावर पृथ्वीला घेतले. मग हा मी पतितच तुम्हांस जड कसा बरे झालो? माझा उद्धार तुम्ही का करू नये? रद = दात.
शरणागताचे रक्षण करण्याचे व्रत घेतलेला (नतावनधृतव्रत) तूच भक्तांच्या
संकटरूपी वनाला (बाधावन) अग्नी प्रमाणे आहेस (अर्थात् तू भक्तांच्या संकटांचा नाश करतोस). तुझ्या
पायांचा ज्यांनी आश्रय घेतला आहे (पदप्रणत) अशांच्या संकटकाळी तूच धावा घेण्यात वेगवान्
(प्रजव) आहेस. त्या गजेंद्राला प्रकट होऊन दया कोणी दाखवली सांग? (अर्थात् तो तूच होतास)
तसेच सती द्रौपदीवर आलेल्या वस्त्रहरणाच्या संकटाचे निवारण करणारा ही तूच होतास, किंवा, युधिष्ठिराच्या (जय)
विजयास्तव युद्धात (रणी) झटणारा ही तूच होतास.
वृंदावनात गायी चारायला कृष्ण, बलराम व इतर गोप गेले असता कंसाच्या सेवकांनी वनास आग लावली व गोप-गायींना वाचविण्यासाठी कृष्णाने ती आग गिळली असे वर्णन भागवतात आहे.
ज्या रतिक्रीडेसारख्या सुखास लक्ष्मी (पत्नी असून सुद्धा) पात्र होत नाही, अशा सुखास तू आपल्या भक्तांची चाकराप्रमाणे (खासदार = नोकर, मूळ फारसी) सेवा करून त्यांस पात्र करतोस. (अर्थात् परमलावण्यवती अशा लक्ष्मीलाही जितके सुख मिळाले नसेल तितके तू तुझ्या भक्तांना त्यांची नोकराप्रमाणे सेवा करून देतोस. इथे सुदाम्याच्या पोह्यांचा प्रसंग आठवावा. भगवान् स्वतः सुदाम्यास आपल्या उच्चासनावर बसवून त्याचे पाय धुतात.) प्रिय अशा पत्नीच्या स्तनाग्रांवर जितक्या सुगंधी द्रव्यांच्या पत्रावळी तुम्ही काढल्या नसतील तितक्या (क्रीडेच्या वेळी कुंकुमकेशरादि सुगंधी रंगित द्रव्यांनी प्रेयसीच्या स्तनादि अवयवांवर ज्या आकृती काढतात त्यांस "पत्रावळी" म्हणतात.) उष्ट्या पत्रावळी (इथे आपली नेहमीची जेवणाची पत्रावळ) तुम्ही धर्मराजाने केलेल्या राजसूय यज्ञाच्या वेळी काढल्या.
अर्थात् - लक्ष्मीच्या स्तनाग्रांच्या कुंकवाने त्याच्या देहाचा नीलिमा नेहमीच अरुणित झालेला आहे.
देवा, वर सांगितल्याप्रमाणे, इतक्या भक्तांना तू त्वरित पावलास, पण तू मला मात्र पावत नाहीस, म्हणून मी तुला आळशी म्हणतो. पण ही उक्ती असत्य आहे. अगदी राजा सत्राजिताने (रविसख) तुझ्यावर घेतलेल्या आळासारखी! (राजा सत्राजिताने आपल्या भावाला प्रसेनला स्यमंतक मणी दिला होता. तो एकदा शिकारीस गेला असता एका सिंहाने त्यास मारले व तो मणी घेतला. मात्र हा मणी कृष्णाने चोरला आहे असा खोटा आळ लोकांमध्ये पसरला.) तर तू आळशी आहेस हा आळ खोटा आहे असे मी मानतो. ज्याप्रमाणे असंख्य लोकांना जेवणामध्ये तृप्त करणाऱ्या दात्याच्या दृष्टीस एक राहून गेलेला भुकेला दिसतो, व लगेच मनाला लाज वाटून त्यास बोलावून जेवायला घालतो, त्याचप्रमाणे कित्येक भक्तांना पावणारा तू आता माझ्याकडे बघ आणि दया कर.
"अगा प्रणतवत्सला!" (हे शरणागतवत्सला)
असे म्हणून ज्या ज्या लोकांनी तुला काकुळतीने हाक मारली आहे, त्यांना तू पावला आहेस. म्हणून मी
सतत तुझेच चरण वंदितो. आणि तू पण "या दीनावर बरी कृपा करू व याचे संकट दूर करू.
याला पुष्कळ ताप झाला आहे." असे मनी धर कारण मला या जगात खरा भरवसा फक्त तुझा
आहे.
देवा, मी काय सांगू! तुमच्या पायांपासून निघालेली जी नदी, म्हणजेच
गंगा, तिच्याकडे माझं पाप धुवून काढायला मी गेलो असता, मला बघून ती म्हणाली,"अगाई,
असे पाप मी कधी ऐकलेही नाही." माझे पाप बघून ती इतकी भ्याली की तिने आपल्या कानांवर
हात ठेवले व डोळे बंद करून घेतले. आता मी जरी माझे काम व्हावे म्हणून उत्सुक आहे (कार्यलोभी)
तरी तिला भिडेस घालणार नाही. म्हणून मी थेट तुमच्याकडे आलो आहे.
तुला सदैव साष्टांग नमन करून माझ्या कपाळावर जरी घट्टे पडले असले तरी तुझ्या पायांशिवाय इतर कोणीही मला तारू शकणार नाही. शरणागतास मुक्त करून, त्याच्यावर कृपा करून, तू म्हणतोस की मीच ऋणात बुडालो आहे, मीच त्या भक्ताचा ऋणी आहे! अशा अतिशय दयाळू असलेल्या तुला जो मनुष्य भजत नाही त्याच्या जीवनाचा धिक्कार असो.
तू मला सर्व इंद्रियांमध्ये पटुत्व दिलेस (मी पूर्णपणे धडधाकट आहे), सर्व प्राणीमात्रांपेक्षा श्रेष्ठ असा मानवजन्म दिलास, चांगल्या कुळात जन्माला घातलंस, आणि इतकेच नव्हे, तर जगात अतिशय दुर्मिळ असलेला ब्राह्मणाचा जन्म ही दिलास. या भवसगरातून तारून नेणाऱ्या तुझ्या यशाचे श्रवण आणि कीर्तन करण्याची आवडही तूच दिलीस. इतकं सगळं असूनही,"मला तुझ्या कृपाप्रसादाचा वर दे." असे अधिकच मागणारा हा मी सर्व याचकांमध्ये खरंच हावरट आहे.
असे
न
म्हणसील
तू
वरद
वत्सल
श्रीकरा ।
परंतु
मज
भासले
म्हणुन
जोडितो
मी
करा ।
दिले
बहु
बरे
खरे
परि
गमे
कृपा
व्यंग
ती ।
अलंकृतिमती
सती
मनि
झुरे
न
जो
संगती ।।१३।।
मागील श्लोकात "तू मला हावरा म्हणशील." असा आरोप मी तुझ्यावर लावला आहे. आता वाटतं की कदाचित् तू असं म्हणणार नाहीस. कारण तू वर देणारा, वत्सल (दयाळू), लक्ष्मीपती (श्रीयुक्त) आहेस. तरीही मला असं वाटलं की तू मला "हावरा" म्हणशील. त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. तू मला पुष्कळ दिलं आहेस (धडधाकट इंद्रिये, उच्च कुळात जन्म, नाम संकीर्तनाची आवड, इ.) ही गोष्ट खरी असली तरी ही तुझी कृपा व्यंग (अपूर्ण) वाटते. सुंदर अलंकारांनी नटलेली, पतिव्रता स्त्री सोबत पती नसल्यास आपल्या मनी झुरते. त्या अलंकरांसरखी तुझी ही कृपा तुझ्याशिवाय मला काय कामाची?
मागील श्लोकात पंतांनी भगवंताला त्याची कृपा अर्धवट असल्याचे सांगितले.
आता ते म्हणतात की, देवा, तुम्ही पूर्ण कृपा करणार असाल तरच मी "पावले"
(मिळाले) असे म्हणेन नाहीतर या व्यंग असलेल्या कृपेचा मी स्वीकार करणार नाही. आणि हो,
जर ती पूर्ण कृपा करायची इच्छा नसेल तर फक्त तुमच्या चरणकमलांचे दर्शन घडवलेत तरी चालेल.
आणि तेही करण्याचे तुमच्या मनी नसेल तर मग या बाकीच्या सगळ्याची (इंद्रियपटुत्व, उच्चकुळात
जन्म, इत्यादींची) तरी काय गरज? तेही अवरून न्या आणि माझ्यापेक्षा त्याला द्या ज्याला
हेच पुष्कळ वाटत असेल! मला कशाला? मी मात्र तुमच्या दर्शनासाठी हावरा राहीन.
मागील श्लोकात पंतांनी भगवंताला "तू तुझे दर्शन देऊन पूर्ण
दया करणार असलास तरच तू दिलेल्या या ज्या इंद्रियपटुत्वादि इतर गोष्टी आहेत त्या मला
मान्य आहेत. तसे करणार नसलास तर मग या इतर गोष्टीही मला नको. ज्याला त्यांची गरज आहे
त्याला दे. मी मात्र तुझ्याच साठी हावरा राहीन." असे म्हटले आहे. याच मुद्द्याला
पुढे नेत पंत म्हणतात, तू यातला दुसरा मार्ग निवडलास तर "हा दिलेले दान परत घेतो"
अशी तुझी अकीर्ती जगात होईल. तरी मग असे न होऊ देता तू मला तुझ्या सुनिर्मल अशा पावलांचे
दर्शन दे. थोडक्यात म्हणजे काहीही करून मला तू दर्शन दे हा आशय. आणि अगदी शेवटचा मार्ग
तुला मी देतो, तो म्हणजे तुझ्या आवडत्या लोकांकडे (अर्थात् संतांकडे) मला हवाली कर.
त्यांना जे योग्य वाटेल तसे ते करतील, तू किमान शिफारस द्यायला का लाजतोस?
म्हणे तुज नसो तसी विकृति भाविकाला जसी ।
परंतु अपराध हा गुरु म्हणोनि शिक्षा करी ।
असेचि धरिली नयच्युतदमार्थ दीक्षा करी ।।१६।।
अरे! किती निखळ (निपट) उद्धट (धृष्ट) आहे
मी, जो चक्क प्रभुवराला "का लजतोस?" असे म्हणतो! जशा भाविकाला लज्जा वगैरे
विकृति आहेत तशा तुला कशा असणार? कारण तू तर निर्विकार आहेस. पण तुझी लाज विचारण्याचा
जो अपराध मी केला, तो मोठा (गुरु) आहे व त्याची मला तू शिक्षा दे. तसेही सत्याच्या मार्गावरून
च्युत झालेल्यांचे दमन करण्यास (नयच्युतदमार्थ) तू आपल्या हाती दीक्षा (चक्रादि आयुधांची सामग्री) धरलीच
आहेस.
भगवंता, तुला जसा "का लाजतोस?" असे विचारण्याचा अपराध मी केला, तसेच किती कोट्यवधी अपराध मी सारखे रचित असतो, आणि हे मीच माझ्या तोंडून सांगताना मला तिळभरही लाज वाटत नाही! असा मी कोडगा (कोटिगा) आहे. पण ज्या पोटात तुम्ही शतकोटी ब्रह्मांड (अज=ब्रह्म) नेहमी नांदवता, त्या पोटात हे अपराध घालण्यासाठी जागा (अवकाश) नाही? मग वृंदावनात जेव्हा आग (दव) लागली होती तेव्हा तिला आपल्या पोटी स्थळ का दिले?
तुझ्या पोटाने पुष्कळ शरण आलेल्यांचे अपराध (प्रणतमंतु) पचविले आहेत. पण तेच तुझे पोट माझे अपराध पचवीत नाही हा दोष माझ्याच अपराधांचा असावा. तेच इतके वाईट आहेत की तुझे पोट ते बाहेर फेकते! मग याला काय उपाय करता येईल? तर तुम्ही ते अपराध त्या तुमच्या पोटातल्या वृंदावनात गिळलेल्या अत्यंत भुकेल्या अग्निस अन्न म्हणून द्या. तुमच्या दयेच्या नद्या दयेसाठी तहानलेल्या शरणागतास नेहमीच (श्रिता) तृप्त करतात.
पदे चरित दाविजे त्रिजगदब्जकीलालसे ।
मदुद्धरण मात्र का जड तुम्हा दिसे वारिती ।
स्वकव्यसन मर्त्य ही न करितीच सेवा रिती ।।१९।।
जे इतर कोणाकडूनही होणार नाही असे ते (माझे अपराध पोटी घालण्याचे
कार्य) तुमच्याच लीला करून विसावलेल्या (लीलालसे = लीला + अलसे) पायांनी, जे त्रिलोकरूपी
कमलास (त्रिजगदब्ज) पाण्याप्रमाणे (कीलालसे) आहेत असे तुमचे चारित्रच (वामनाच्या कथेतून)
दाखवते, त्यांचेकडूनच होऊ शकेल. माझा उद्धारच मात्र तुम्हाला का जड जातो आहे? अहो,
आम्ही मर्त्यही आपल्या लोकांस संकटात (व्यसन) मदत करतो, सेवा फुकट (रिती) जाऊ देत नाही!
मग तुम्ही तर आमचे त्राते आहात, तुम्ही का माझा उद्धार करीत नाही?
टीप -
१) "त्रिजगदब्जकीलालसे" - वामन अवतारात भगवान् विष्णूंनी
बटू होऊन तीन पायांनी तिन्ही लोक व्यापले. म्हणून त्रिलोकरूपी कमलास व्यापणारे पाणी
हेच आपले पाय होत. दुसरा अर्थ असा ही करता येईल की, सृष्टी, स्थिती आणि लय यांपैकी
स्थिती ही भगवान् विष्णूंकडे भगवंताचे पाय हे त्रिलोकरूपी कमळाचे आश्रयस्थान जे पाणी
त्यासारखे आहेत.
२) इथे "लीलालसे पदे" अशी शब्दरचना आहे. "लीलालसे"
हे विशेषण "पदे"प्रमाणेच तृतीयेत आहे. ही पद्धत संस्कृत व्याकरणाची आहे.
मराठीत आपण विशेषणाला विशेष्याची विभक्ती देत नाही. उदा. "काळ्या शाईने"
असे म्हणतो; "काळ्याने शाईने" असे नाही. तेच संस्कृतात "कृष्णया मष्या"
असे झाले असते. तरी इथे "लीलालस पदे" असा अर्थ घ्यावा.
३) "मदुद्धरण मात्र का जड तुम्हा दिसे?" इथे अर्थ पूर्ण
होतो. "वारिती" हे पुढच्या ओळीसाठी आहे. "मर्त्य ही स्वक व्यसन वारिती,
न करितीच सेवा रिती." असा अन्वय.
भगवंता, तू दयारूपी जलाने भरलेला मेघ आहेस. तुझ्या चातकरूपी सेवकांकडे वळून त्यांवर
तुझ्या दयेचा, कृपेचा वर्षाव केलास तर खरोखर त्यांना काहीच कमी राहणार नाही. तुझ्या
भक्तांना तू का कंटाळशील (उबगशील)? (अर्थात् कधीच उबागणार नाहीस). अनन्यगतिक (ज्यांस
तुझ्याशिवाय दुसरी गती नाही असे), सोपद्रव (सांसारिक उपद्रवांनी पिडलेल्या) लोकांना
बघताच, हे करुणेच्या सागरा, तुझे मन पुष्कळच (उमोप = पुष्कळ) द्रवित होईल!
अतिशय निर्मल चरित्र असूनसुद्धा कलीने पूर्वी ‘नळ’ राजाला भयानक
कठीण प्रसंगांनी छळलं. माझे चरित्र तर तितके विशुध्दही नाही! मग तो मला किती बरे छळेल!
माझी अवस्था तर वणव्यात (दावानल) होरपळणाऱ्या नाकतोड्या (शलभ) सारखी होईल! (हे कीडे
प्रकाशाकडे आकर्षित होत असल्याने, रात्रीच्या वेळी वणवा पेटला की त्याकडे ते धाव घेतात
आणि होरपळून जातात) ; आणि माझ्या मनातले कामक्रोधादि षड्रिपु , कोण्या मरायला टेकलेल्या
जनावराच्या डोक्याशी चोच मारण्यासाठी (व्रणार्थ) जसे कावळे उभे राहतात, तसे उभे आहेत.
अशा अवस्थेत हा कलीरूपी साप या जीवरूपी बेडकाचा काळ कसा होणार नाही? (अर्थात् होईलच.)
असे विदित वासही मज सदाश्रमीचा करा
दया गुण पहा स्वये मज सदाश्रमी चाकरा ।।२२।।
अन्वय - नाविका, तुमच्या बळे भवमहानदी तरेन. मग आतरास्तव तुम्हीच मला सुदीना विका. मज सदाश्रमीचा वासही विदित असे. दया करा, स्वये गुण पहा, मज सदाश्रमी चाकरा.
मागील केकेत स्वतःची भयानक अवस्था पंतांनी वर्णित केली. आता तिच्यातून सोडविण्यासाठी ते भगवंताला विनवत आहेत - "हे नाविका, तुझ्याच बळाने मी ही भवरूपी महानदी तरेन. पण इतक्या दुस्तर महानदीला पार करून दिल्याबद्दल मजकडे तुम्हाला देण्याकरिता काहीच मोबदला (आतर) नाही. मग मोबदला म्हणून तुम्ही अत्यंत दीन अशा मलाच चाकर म्हणून विकत घ्या. तुमच्याकडे आल्यावर कसे वागावे हे सज्जनांचेकडे राहिल्याने शिकलो आहे. तेव्हा एवढी दया तुम्ही करा, पाहिजे तर स्वतः गुण बघून घ्या व नेहमी कष्ट करणाऱ्या मला आपला चाकर करून घ्या."
धना परिजना घरा तुमचिया उणे कायसे ।
मागील केकेत पंतांनी भगवंताला, "तुम्ही मला आपला चाकर करून
घ्या." असे विनविले, व आपल्या गुणांची पारखही करून घ्यायला सांगितली. असे म्हटल्याबरोबर,
पंतांना लगेच आपल्या अवगुणांची, त्रुटींची जाणीव झाली. म्हणून ते आता म्हणतात की, हे
भगवन् , आपल्या घरी मजपेक्षा कित्येकपटीने चांगले असे नोकर चाकर (परिजन) आहेत. तुमच्या
घरी धनाची काय कमी आहे? मग आपण काय म्हणून मला घ्याल? पुष्कळ सोने, माणिक, मोती जवळ
असलेल्या राजाने लोखंड (अयस्) घेऊन काय लाभ होईल? तरीदेखिल, थोर व्यक्ती सर्व वस्तूंना
संग्रही ठेवत असतात व त्यांच्या गुण वैशिष्ट्यांना कमी न लेखता त्यांचा उपयोग करून
घेतात. तेव्हा मजसारख्या हीनाचाही आपण उपयोग करून घ्या.
मी गरीब बिचारा दास (रंक) दिसत
असलो तरी, ही काही माझी स्थायी (शाश्वत) प्रकृती नाही. अर्थात्, माझी अवस्था
कायमचीच दयनीय राहील असे तुम्ही समजू नका. प्रभो, प्रसन्न अशा तुमच्या पायांना लक्ष्मीच्या
(इंदिरा) पीन अशा स्तानांचा संग सोडून माझ्या शिरावर ठेवून तर बघा! तुम्हास श्रीशंकराइतकाच
(गंगाधर) चारित्र्यवान (समसुशील) सखा मिळेल.
प्रभु स्तुति न ठाऊकी परि तिच्या महाकामुका
हे सर्व माझे बालिश बोल ऐकून तुम्ही म्हणाल की,"भगवंताची स्तुति कशी करावी हे ठाऊक नसून सुद्धा, त्या स्तुतीचा अत्यंत शोकीन (महाकामुक) अशा मला हा बिचारा (कृपण) मुका मला पुष्कळ सकाम हाका मारतो आहे. पण मनी असे धरा की,"पहिल्याच वेळेला लेकराला नीट कसे बोलता येईल? हळू हळू त्याला योग्य मार्गाला लावून पटुत्व येईल असे करा.
जनी तरि असें असे शिशुहि जे मुखे वर्ण वी ।
पिता पिउनि ते भुले मधुरता सुखे वर्णवी ।
मना जरि न ये गुरूक्तहि म्हणे कटुप्रायशा ।
दयानिधि तुम्हां पुढे जनकथा अशा कायशा ॥२६॥









Comments
Post a Comment