आर्याभारताच्या वनपर्वाच्या अंतर्गत - नलपर्व
आर्याभारतांतर्गत वनपर्वातील ४था अध्याय
नलोपाख्यानपर्व
श्रीवीरसेनसुत नळ निषधेश्वर सुगुणमणिकरंडक हो ।
ब्रह्मण्यप्रभु दुर्गतदारिद्र्यसमुद्रवरतरंडक हो ॥१॥
वीरसेनाचा मुलगा "नल", निषध देशाचा अधिपति, उत्तमगुणरूपी मण्यांनी भरलेला करंडा (दागिने ठेवण्याचा पेटारा) होता. तो ब्रह्मण्य म्ह. ब्राह्मणांचे हित चिंतणारा किंवा ब्राह्मणांना आश्रय देणारा, तसेच अभाग्यवश (दुर्गतिने) दरिद्रतारूपी समुद्रामध्ये बुडत असलेल्यांसाठी उत्तम नौकाच (तरंडक) होता. अर्थात् तो अतिशय दानशूर होता.
तो पुण्यश्लोक रणी करिता रिपुवीरहानि वासवसा ।
तत्कीर्ति म्हणे, "गी-श्री-धी हो! या, योग्य हा निवास, वसा." ॥२॥
तो पुण्यश्लोक (पावन कीर्ति असलेला) नळ राजा युद्धामध्ये इंद्राप्रमाणे (वासव म्ह. इंद्र) शत्रूंच्या वीरांची हानि करीत असे. त्याची कीर्ति, "हे वाणि! हे लक्ष्मि! हे बुद्धे! तुम्ही सर्व जणी या नळाच्या ठिकाणी रहायाला या. हा तुमचा निवास म्हणून योग्य आहे." असे म्हणत असे. अर्थात् त्याच्या शुद्ध आचार - धार्मिक्य - दातृत्व - तितिक्षादि गुणांमुळे त्याची कीर्ति सर्वत्र पसरली, आणि त्या पावन कीर्तिनेच त्याच्याजवळ वाक्पटुत्व, धन आणि सुबुद्धि हेही आले.
Comments
Post a Comment