मोरोपंत - सीतागीत (रामायण अभंग)

यज्ञासाठी भूमी । नांगरीता धन्या । सांपडली कन्या । सीतादेवी ॥
जनकाची पुत्री । दुर्जना दुर्मिळा । ती भार्या उर्मिळा । लक्ष्मणाची ॥ 
जनकाचा बंधू। होता येकनिष्ठ । वयाने कनिष्ठ । श्रेष्ठ गुणे ॥
तेणे भरतासी । मांडवी दुहिता । दिली, जी सुहिता । दोही कुळी ॥
शत्रुघ्नाला दिली । दुजी श्रुतकीर्ती । जीची गाती कीर्ती । पतिव्रता ॥
चवघी बहिणी । भाग्ये जाल्या जावा । त्यांचा गीती गावा । सुसंवाद ॥
वनवासवृत्त । सीतेसी पुसती । प्रेमे त्या सुसती । तिघीजणी ॥ 
सीता म्हणे - ऐका । वनवासकथा । परि मनी व्यथा । न धरावी ॥
चित्रकूटाहूनि । पादुका घेऊनी । वियोग देउनी । तुम्ही आला ॥
आम्हीही तेथूनी । तसेच निघालो । वनात रिघालो । तिघेजण॥ 
लक्ष्मण भावोजी । मागे पुढे स्वामी । मज आहे धामी । ऐसे वाटे ॥
न बाधेचि मज । उष्ण क्षुधा तृषा । तुम्हांपासी मृषा । न बोलावे ॥
जेव्हा काही वाटे । चालता मी भागे । मुरडोनि मागे । विलोकीती ॥ 
बाई काय सांगो । स्वामींची ती दृष्टी । अमृताची वृष्टी । मज होय ॥ 
अत्रीच्या आश्रमी । नेले मज वाटे । माहेरचि वाटे । खरेखुरे ॥ 
अनसूया सती । करी वेणीफणी । आनंदाची धणी । दिली मज ॥ 
आजवरी वोली । चंदनाची उटी । आली नाही तुटी । माळागुणी ॥ 
ऋषींते वंदीत । गेलो गोदातटी । जेथे पंचवटी । पुण्यस्थान ॥ 
भावोजींनी केली । माजी बहु सेवा । ती त्या महादेवा । ठावी असे ॥ 
तेथे शूर्पणखी । भार्या व्हाया आली । तिला माजी भ्याली । चित्तवृत्ती ॥ 
भावोजीनी तीचा । कर्णनासाच्छेद । केला, की ते वेद- । शास्त्रार्थज्ञ ॥ 
तीचा भावू खर । होवूनीयां क्रुद्ध । करावया युद्ध । आला बाई ॥ 
चवदा सहस्र । राक्षस पापिष्ट । रणी केले पिष्ट । स्वामींनी ते ॥ 
तीणे घ्राण रक्ते । मुख मळवीले । वृत्त कळवीले । रावणासी ॥ 
छळाचा उपाय । मनी आठवीला । दुष्ट पाठवीला । मायामृग ॥ 
स्वर्णरत्नमय । मृग म्या देखीला । तो सत्य लेखीला । मनामध्ये ॥ 
गृहा आणावया । मार्गे हरिणा मी । दुःख परीणामी । नेणोनीया ॥ 
मज रक्षावया । लक्ष्मणा ठेऊनी । निघाले घेऊनी । धनुर्बाण ॥ 
मायामृगामागे । जगदेकशूर । गेले बहु दूर । अरण्यात ॥ 
कपटी राक्षस । जाणोनिया, बाण । घ्यावयासि प्राण । मोकलीला ॥ 
तो बाण लागता । हृदय विदारी । दुष्ट हांक मारी । स्वामीवाणी ॥ 
'हा सीते! हा बंधो! । लक्ष्मणा! ये धावे । अंतकाळी यावे । भेटावया' ॥ 
मज वाटे माज्या । स्वामींचीच हाक । सिरे कंप धाक । हृदयात ॥ 
मी म्हणे, 'भावोजी! । धावा रक्षा प्राण । हे घ्या चाप बाण । उठा वेगी' ॥ 
भावोजी म्हणती, । 'राक्षसाची माया । कोण रामराया पाहो । शके?' ॥ 
वाटले ते वाक्य । सत्य परी खोटे । जाले दुःख मोटे । माज्या मनी ॥
न वदावे तेचि । बोलिले मी कोपे । चित्त शब्दरोपे । विदारिले ॥ 
'वांछितोसि दुष्टा । अग्रजाचा घात । माझ्या अंगा हात । लावावया ॥ 
हात लाविताचि । सोडीन मी प्राण । शिरी पादत्राण । कोण वाहे ॥ 
माज्या दृष्टीपुढे । नको राहो, जाच । नरकीचा जाच । मूर्त तूचि' ॥ 
ऐसी बाई माजी । ऐकताचि वाणी । डोळा आले पाणी । भावोजींच्या ॥ 
मातेने दापिता । वत्स पित्याकडे । जाय, तैसे घडे । लक्ष्मणासी ॥ 
साधुसी गांजीता । झाले सद्या फळ । सज्जनाचा छळ । करू नये ॥ 
वाटेत धनुष्ये । ओढूनिया रेघ । गेले दयामेघ । स्वामींकडे ॥ 
तो आला रावण । होवूनी संन्यासी । न कळे अन्यासी । छद्म त्याचे ॥ 
भिक्षा द्याया गेल्ये । रेघेच्या बाहेर । सासुरे माहेर । बुडवाया ॥ 
न लंघीत्ये जरी । धनुष्याची रेखा । तरी त्याचा लेखा । काय होता ॥ 
रेघेच्या बाहेरी । जसा दिला पाय । झाला महाकाय । दशमुख ॥ 
जसा हरीणीते । हरीतो लांडगा । तसा तो दांडगा । हरी माते ॥ 
त्या पाप्याच्या स्पर्शे । हा देह कोमेला । आकाशी तो मेला । रथी चढे ॥ 
'हा राम! लक्ष्मण!' । ऐसी हाक माजी । जटायू मामाजी । आयकती ॥ 
सखे दशरथ । मामाजींचे आप्त । सोडावया प्राप्त । जाले दैवे ॥ 
जातीचे ते गृध्र । वृद्ध मोटे शूर । रथ केला चूर । रावणाचा ॥ 
चंचूनखायुध । गृध्र युद्धदक्ष । रावणाचे वक्ष । विदारीते ॥ 
अन्याये रावण । छेदी त्यांचे पक्ष । मज वाटे लक्ष- । बंधूघात ॥ 
मूर्छित मामाजी । पडले भूवरी । स्कंधी वाहे अरी । मला बाई ॥ 
रडता काढीले । पांचसात नग । वस्त्रखंडी मग । बांधीले म्या ॥ 
पर्वती वानर । देखिला म्या मग । त्यांमध्ये ते नग । सोडीयेले ॥ 
शतगावे सिंधु । त्यात एक लंका । तेथे ने कलंका । लावावया ॥ 
नेवूनिया ठेवी । अशोकवनात । न शोक मनात । माये माज्या ॥ 
सहस्र राक्षसी । करिती रक्षण । चिंतातीर क्षण । न सांपडे ॥ 
दिव्यान्नाचा ज्यात । नानापरी थाट । धाडी नित्य ताट । शक्रभार्या ॥ 
दिव्यान्नाचे ताट । ये मजजवळ । भक्षी मी कवळ । एकदोन ॥ 
फिरले घेवूनी । मारीच्याचे प्राण । दिव्यधनुर्बाण- । पाणी मागे ॥
मार्गी लक्ष्मणजी । करिती वंदन । श्रीरघुनंदन- । चरणांते ॥ 
म्हणती, 'वत्सा! त्वां । का आज्ञा मोडीली । एकली सोडीली । का ती वनी?' ॥ 
भावोजीनी सर्व । वृत्त कळवीले । मुख मळवीले । अश्रुपाते ॥ 
ऐकोनी बोलीले । स्वामी, 'झाले खोटे, । राक्षसानी मोटे । विघ्न केले' ॥ 
दोघांच्या हृदयी । धडधड करी । आले झडकरी । धावोनीया ॥ 
पर्णशाळेमध्ये । देखिले कावळे । स्वामींचा मावळे । धैर्यसूर्य ॥ 
केला आधी फार । शोध, मग शोक, । धन जाता लोक । करी जसा ॥ 
शोधीता वनात । मामाजी पाहीले । धरूनी राहीले । कंठी प्राण ॥ 
पुसती, 'बापाजी, । झाली हे का गती?' । मामाजी सांगती । अर्धशब्द ॥ 
स्वामींपासी माजे । सांगता हरण । पावले मरण । शोकभरे ॥
'हा तात! हा तात!' । म्हणोनी रडले । मूर्छित पडले घडीभरी ॥ 
मामाजींची सांग । संपादिली क्रिया । त्या काळी हे प्रिया । नाठवीली ॥ 
पुन्हा वनी माते । रडत शोधीती । लक्ष्मण बोधीती । नाना यत्ने ॥ 
आलिंगिल्या वल्ली । वियोगे भ्रमले । शोधिता श्रमले । रात्रीदीस ॥ 
वनी कबंधाने । केला होता घात । च्यार कोस हात । लांब त्याचे ॥ 
धरिता खड्गानी । केला भुजच्छेद । शाप ताप खेद । निवारीला ॥ 
मतंगमुनीच्या । आश्रमी शबरी । व्हाया यश बरी । युक्ति सांगे ॥ 
हनुमंतावरी । केली अनुकंपा । या प्रभुनी पंपा- । सरोवरी ॥ 
सुग्रीवासी भेटी । ऋष्यमूकी झाली । त्याची दृष्टी धाली । पाहाताची ॥
यांच्या मुखे वृत्त । आयकीले मग । आणोनी ते नग । दाखवीले ॥ 
सुग्रीव वानर । सूर्याचा तनय । ज्या स्वप्नी अनय । नाही ठावा ॥ 
दोषावीणे रागे । सुग्रीवासी जाची । त्याच्या अग्रजाची । बुद्धी खोटी ॥
बंधुची स्त्री वाळी । बलात्कारे भोगी । सुग्रीव तो जोगी । केला होता ॥ 
एक बाणे वाळी । स्वामीनी मारीला । सुग्रीव तारीला । संकटात ॥ 
वानरांचे राज्य । दिले सुग्रीवाला । तो फार निवाला । उपकारे ॥ 
माजी वार्ता कोणा । नकळे किमपी । पाठवीले कपी । शोधावया ॥ 
न लागता माझा । शोध, कपी सारे । म्हणती ते, 'हा रे । दूरदृष्टा!' ॥ 
मारील सुग्रीव । लंघीला अवधी । मरावे नवधी । करू नये ॥ 
समुद्राच्या तीरी । पर्वती रडले । मराया पडले । उपोषीत ॥ 
'धिक्कार आम्हाला । झालो सेवाचोर । व्यर्थ मृत्यु थोर । खेद वाटे ॥ 
श्रीरामाची भार्या । सोडवीता मेला । जटायु तो गेला । सद्गतीसी ॥ 
ऐसे जे बोलीले । वाणी दे कंपा ती । विचारी संपाती  । गृध्रराज ॥
वार्ता वाटे कानी । पडता शंपा ती । रडला संपाती । बंधूशोके ॥ 
त्याने सांगीतली । त्यांला माजी शुद्धी । त्याची कविबुद्धी- । सम दृष्टी ॥
शतगावे बाई । मारुती उडाला । पुण्ये न बुडाला । सागरांत ॥ 
पुरी शोधी, होय । सशोक मनांत । अशोकवनांत । मग आला ॥ 
तो रात्री रावण । प्रार्थी, बडबडे, । बुद्धी गडबडे मारुतीची ॥ 
पाण्यापरीस म्यां । पातळ तो केला । मग रागे मेला । असे म्हणे - ॥
'दो मासांत । मान्य न होता हे मारा । राक्षसी हो ! चारा । मास मज' ॥ 
ऐसे राक्षसींला । सांगोनी तो जाय । म्हणे 'हाय! हाय!' । हनूमंत ॥ 
हळूच मारुती । सद्गुणसमुद्रा । वर्णी , मग मुद्रा । मज दावी ॥ 
निववी हृदय । प्रियसखी मुद्रा । काय सुधा क्षुद्रा । नीववील? ॥ 
मज म्हणे चाल । बैस माज्या स्कंधी । तू दूर्गा मी नंदी । दास तूजा ॥ 
तेव्हा मी बोलील्ये । नेसील बा खरे । परी नव्हे बरे । असे जाणे ॥ 
युद्धी मारीतील । या मेल्यासी स्वामी । तेव्हा मुख बा मी । दाखवीन ॥
मग ते अशोक- । वन कपी मोडी । राक्षसांचे झोडी । बळे सैन्य ॥ 
मारील संगरी । रावणाचा अक्ष । कुमार जो दक्ष । रणरंगी ॥ 
इंद्रजिताला तो । दाटूनी सांपडे । हनुमंत पडे । ब्रह्मपाशी ॥ 
रावणे वानर । मानूनीया तुच्छ । पेटवीले पुच्छ । जाळावया ॥ 
पुच्छ पेटताचि । हनुमंत उडे । लंकेमध्ये हिंडे । वाडे जाळी ॥ 
देवांनी वदनी । घातली आंगोळी । लंकेची रांगोळी । पाहोनीया ॥ 
विचारुनी मज । जाय स्वामीकडे । पायांवरी पडे । हनूमंत ॥ 
माजा समाचार । ऐकोनी हर्षले । प्रेमाश्रू वर्षले । स्वामी माजे ॥ 
स्वामींस मद्वृत्त । करी सुप्रसन्न । जैसे दिव्य अन्न । क्षुधार्ताला ॥ 
हनुमंतावरी । झाली दया मोटी । उपकार कोटी । मानीयेले ॥ 
निघाले घेवूनी । वानरांची सेना । धरणी दिसेना । सूर्यप्रभा ॥ 
रावण धर्माच्या । वाटे न लागला । सांगोनी भागला । बिभीषण ॥ 
नायके रावण । क्रोधानळे पेटे । श्रीमंतांसी भेटे । सिंधुतटी ॥ 
म्हणे, ‘गुणकल्प- । वृक्षांच्या अरण्या! । दयाळा! शरण्या! । रक्षी मज' ॥ 
स्वामींचे शरणा- । गती प्रेम प्राज्य । दिले लंकाराज्य । वंदिताचि ॥ 
भेटला सागर । जोडूनीया करा । म्हणे, 'सेतु करा, । तारा मज' ॥ 
शतगावे सेतू । समुद्री रचीला । पर्वती खचीला । मार्ग मोटा ॥ 
सेतुपथे सिंधु । लंघुनीया आले । वार्तामृते धाले । कर्ण माजे ॥ 
दूत पाठवीला । दुर्जनभंगद । तेजस्वी अंगद । वाळीपुत्र ॥ 
स्वामींचा निरोप । दोही लोकी पथ्य । सांगीतला तथ्य । अंगदाने ॥ 
खळ नेघे वाक्य । स्वामींचे तोखद । न सेवी ओखद । गतायुष्य ॥ 
म्हणे, 'आम्हांपुढे । बोलते वाकडे । मर्यादा माकडे । टाकीली की ॥ 
राक्षस हो धरा । मारा धावा चावा । पळ न वाचावा । हा मर्कट' ॥ 
आंगासी राक्षस । झोंबले चवघे । झोडूनी अवघे । पिष्ट केले ॥ 
उडता मोडीली । स्वर्णवज्रसभा । मळवीली प्रभा । रावणाची ॥
धर्ममर्यादेच्या । संकोचे थोपले । अधर्म कोपले । राक्षसाच्या ॥ 
ज्याला चावावया । वज्राहूनी गाढा । काळाच्या हा दाढा । न शकल्या ॥ 
ते राक्षस लक्ष- । कोटी बळपूर्ण । वानरांनी चूर्ण । नखी केले ॥ 
रक्तनद्या तेथे । शतशा वाहिल्या । देवानी पाहील्या । डोळाभर ॥ 
मारिले प्रधान । रावणाचे पोर । त्यांत बळी थोर । इंद्रजीत ॥ 
रावणाचा भ्राता । कुंभकर्ण काळ । तेणे कपिपाळ । धरीयेला ॥ 
बहीणीची तसी । त्याची करी गती । स्वये कपिपती । सुटोनीया ॥ 
जसे बरे गरे । बहु कपिभट । तेणे गटगट । गिळीयेले ॥ 
पळाया त्यां वाट । मिळे कर्णी नाकी I मिथ्या वर्णीना की । जानकी मी ॥ 
प्रभुनी हरिले I तत्तेज सर्व ते । नुरावे पर्वते I वज्रापुढे ॥ 
माजे स्वामी जाले I त्या तमा तरणी । यांची मात रणी I काय सांगो? ॥ 
इंद्रासी असह्य I इंद्रजित, परी । मारीला तो अरी I भावोजींनी ॥ 
वाहुनी मस्तके I तोषवीला भर्ग । कांपवीला स्वर्ग I कैलासही ॥ 
तो काय सामान्य? I परी झाला गर्व । त्याचे तेज सर्व I वाया गेले ॥
मारीला प्रभुंनी । सहपरिवार । उतरिला भार । धरणीचा ॥
उर्मिळे! मूर्छित । तुझे माझे धणी । जाले होते रणी । सेनेसह ॥
वाचवीले सर्व । हनूमते बाई । सांगो याचे काई । उपकार? ॥ 
ओषधीपर्वत । समूळ खाणीला । बडीत आणीला । जसा चेंडू ॥ 
हनूमंते आम्हा । दिले चूडेदान । ऐसा नाही आन । आप्त कोण्ही ॥ 
उठले वानर । अमृतवृष्टीने । स्वामींच्या दृष्टीने । हेचि सत्य ॥ 
शिबिकेत मज । घालूनी आणीले । देह म्या न्हाणीले । अग्निकुंडी ॥ 
त्या काळी देवानी । केली पुष्पवृष्टी । आनंदाने सृष्टी । कोंदाटली ॥ 
आले दशरथ- । मामाजी विमानी । धन्या जीवी मानी । आपणा मी ॥ 
देवांची प्रार्थना । मामाजींची आज्ञा । केली सर्व प्राज्ञां । सुखवाया ॥
मांडीवरी मज । घेतले स्वामींनी । घनी सौदामिनी । जना वाटे ॥
भृंगपतियुक्त । पुष्प कवि मानी । पुष्पकविमानी । जै बैसले ॥
स्वामींनी समुद्री । दाखविला सेतु । भवाब्धीत हेतु । तरावया ॥ 
रुंद दहा गावे । लांब शत गावे । पाप न तगावे । जो देखता ॥ 
दाविली किष्किंधा । भेटविली तारा । सुग्रीवाची दारा । जाऊबाई ॥ 
स्वामींच्या मुखींच्या । ज्या म्या आयकील्या । गोष्टी, काय कील्या । सर्वस्वाच्या ॥ 
'अवधी टळेल । असे नच वदा । असेन चवदा । वर्षे वनी' ॥ 
ऐसा भरतासी । शत्रुघ्नासी बोल । प्रभुनी तो फोल । केला नाही ॥ 
संतती संपत्ती । वाढे होय हित । प्रेमे गाता गीत । श्रीरामाचे ॥ 
न बाधे पर्जन्य । वात उष्ण शीत । प्रेमे गाता गीत । श्रीरामाचे ॥ 
धन्य धन्य होय । संसारी जीवित । प्रेमे गाता गीत । श्रीरामाचे ॥ 
काळापासूनीही । नव्हे चित्त भीत । प्रेमे गाता गीत । श्रीरामाचे ॥ 
अंती वसे स्वर्गी । अमृताते पीत । प्रेमे गाता गीत । श्रीरामाचे ॥ 
श्रीरामाते ध्यावे । श्रीरामाते गावे । श्रीरामात भावे । आठवावे ॥ 
रामाचे चरित । अमृतभरित । सेवावे त्वरित । सर्वांनीही ॥
श्रीरामाचे गीत । गातील ज्या कन्या । होतील त्या धन्या । संसारांत ॥
या श्रीरामदया- । तोयदासमोर । होय दासमोर । आनंदित ॥इति॥

Comments

Popular posts from this blog

कृष्णविजय - अध्याय पंधरावा - भगवंतांनी केलेली बलरामस्तुति (English Translation)

मोरोपंत - केकावली

आर्याभारताच्या वनपर्वाच्या अंतर्गत - नलपर्व​