मोरोपंतकृत कृष्णविजयातील प्रकरणे - २. "बाळक्रीडा"
वसुदेवोक्ते भर्गप्रतिम ज्ञानी विवेकजितषड्वर्ग
प्रेमभरे अपवर्ग-प्रदपद देखावया व्रजा ये गर्ग
विप्रोत्तम हा नंदे पूजियला सविधि नमुनि सुमहानंदे
नामकरण त्याकरवी पुत्रांचे गुप्त उक्तरीत्या करवी
भूतभविष्यत्कथन प्रकट करी परि न तो रहस्य विमथन
“संकर्षण”, “राम”, “बळ” ज्येष्ठाख्या हा द्विषज्जनविरामबळ
दुसऱ्यास सुखनिधाने “कृष्ण” तथा “वासुदेव” ही अभिधाने
x-x-x
लागति रांगायाला करिति चरित्रे कवीश्वरां गायाला
ते दोघे भाउ रती व्रजनयना देति नान्यशोभा उरति
करिति उदार कलीला नाशाया प्रेक्षणीय दारकलीला
हरिति मन भ्रम हेला-मात्रे सुख पावती अदभ्र महेला
हळु हळु रांगति, लाजे श्री मनि, दे, ते मुनीश्वरां गतिला जे
ते सदुदार करीती लीला गोष्ठांत गोपदारकरीती
लघु-मंजुळ-सिंजित की लेवविली भूषणें; मधुरसी जितकी
ऐकुनि कुतुक मनी या जननीच्या देति करुनि गति कमनीया
लघुगति करित मुरडणे जननिकडे जनभये सुचकित मुरडणे
तनु भरिती जंबाळे, गळा बळे घालिती मिठी जैं बाळे
दाटे पान्हा थानी, सेवावा आग्रहे जगन्नाथानी
घेउनिया उत्संगी स्तनपानी सावरूनिया हृत्संगी
मुग्ध-स्मित-मित-रदन-श्री-वदन विलोकिती सुखाचे सदन
हर्षविती जननि, करी अवलंबुनि वत्सपुच्छ ते जननिकरी
चालति बहु खेळ गडी गोपांचे दाविती असे खेळगडी
माता देखतिच पळ व्यग्रत्वे पळति केलिपर अतिचपळ
निजगृहसुतरक्षण ही न सकति दोन्ही; न दोंत इतर क्षण ही
मन बहुधा लेकांही जननीचे सुखविले न धाले काही
बहु आवडि, रुचि राहे अमृती, लीला तयाहुनी रुचिरा हे
हरिलीला आबाळ व्रज पाहे नित्यकृत्य ही आबाळ
संस्कारे करि कामे तनु कृष्णी मन सुखी विशोक रिकामे
हरिलीलारसिक थवे गोपींचे प्रेमरीति मज कसि कथवे?
न पळे भजे मन शय न प्रीतिपुरःसर अगार जेमन, शयन
गीते ये मृग वळणी, लीलेने मोहिल्या तशाचि गवळणी
प्रथम समान सत्यांचे नकळत हरिलेचि सरसमानस त्यांचे
जो त्रिभुवनराजपती ब्रह्मेशानादि ज्या सुरवरा जपति
गोपकिशोरसखा तो होउनि चोरूनि कृष्ण गोरस खातो
चोरुनि गोरस खातो परि दे गोपीस तोष थोर सखा तो
x-x-x
Comments
Post a Comment